नितीमुल्यांवर नाचणारी पत्रकारीता...



नितीमुल्यांवर नाचणारी पत्रकारीता...
        
          बाळासाहेबानां जाऊन फक्त काही तासांचा अवधी लोटला असतानां इलेक्ट्रोनिक माध्यमांनी चर्चेला व बातमीला बनवलेला हा स्मारकाचा विषय हा टीआरपीसाठी केला जाणारा धंदाच आहे. नुकत्याच काही दिवसांपुर्वी बाळासाहेबांचे दिर्घ आजाराने निधन झाले. बाळासाहेब महापुरुष होते यात वाद नाही परंतु त्यांच्या स्मारकाची घाई लक्षात घेता आज नाही तर कधीच नाही अशी जणु भितीच या माध्यमांना वाटत असल्याचे जाणवते. बाळासाहेबांचे स्मारक शिवाजीपार्क वर व्हावे ही इच्छा मनोहर जोशीनीं बाळासाहेबांच्या अस्थी गोळा करायला गेल्यावर माध्यमांसमोर बोलावुन दाखवली. आता जोशीचे आणि बाळासाहेबांचे संबंध कसे होते हे आपल्याला माहितीच आहे त्यामुळे या संबंधातुन अशीच मागणी जोशी करतील हे सुद्धा अपेक्षितच होते. पण त्यांनी ही मागणी इतक्या लवकर करायला नको होती कारण बाळासाहेबांच्या चित्तेचा अग्नी विझतो न विझतोच महाराष्ट्रातील माध्यमांमध्ये जोशीच्या या मागणी मुळे आगच लागली. सुरु झाला तो बुम आणि कॅमेऱ्याचा खेळ. बाळासाहेबांच्या जाण्याच्या दुखातच सगळे होते तर तेवढ्यात या बातमीने वातावरण तंग केले. शिवाजी पार्कात स्मारक बांधले पाहिजे की नाही यावर सुरु झाला चर्चासत्रांचा कार्यक्रम दादरच्या स्थानिकांना, विरोध करणाऱ्यानां, आणि शिवसेनेच्या नेत्यांना या चर्चासत्राच सहभागी करुन घेतलं जात होतं. महानगर पालिकेच्या कोणीही न विचारणाऱ्या नगरसेवकानांही या बाबत विचारणा करण्यात आली. आणि या प्रसिद्धी साठी गुडघ्याला बाशिंग बाधुन महानगर पालिकेत बसणाऱ्या नगरसेवकानी आपल्या अकलेचे तारे तोडत नको त्या मागणी तसेच मत प्रदर्शनामुळे व त्यानां इलेक्ट्रोनिक मिडीया मध्ये मिळणाऱ्या थेट प्रसिद्धीमुळे या पवित्रविषयाला राजकारणाचा घाणरेडा वास सुटला.. बाळासाहेबांना आवडणाऱ्या सोनचाफ्याचा सुंगध शिवाजीपार्कवर असतानां किंमत नसणाऱ्यांनी असा घाणेरडा वास सोडत वातावरण खराब केले. आणि त्याला सर्वस्वी जवाबदार जरी हे नेते असले तरी त्यांच्या समोर बुम माईक नेणारे वृत्तवाहिन्य़ांही तितक्याच जवाबदार आहेत. ज्या नेत्याने महाराष्ट्रात आपले अढळ स्थान निर्माण केले त्या बाळासाहेबांच्या मुत्यूला काही तास जाताच अशा मागणीने वाद निर्माण होतो यापेक्षा दुर्देवविलास तो कोणता.
              बाळासाहेबांच्या नावाने अनेक उड्डाणपुल, शाळा, रस्ते महामार्ग, रेल्वे स्थानकं, विमानतळ किंवा स्मारकं बांधली जावीत पण त्याच्या नावाचे राजकारण करु नये. आपल्या वडीलांजागी असणाऱ्या काकांच्या जाण्याने दुखी झालेल्या राज ठाकरे यांना सुद्धा आपल्या नगरसेवकाची मागणी बहुदा पटली नसावी कारण ते स्वत इंदुमिल च्या स्मारकाच्या विरोधात आहेत. त्यावर उत्तर म्हणुन आंनदराज आंबेडकरानीं केलेली मागणी ही जरी मनसेला प्रतिउत्तर असली तरी यामुळे बाळासाहेबांच्या आत्म्याला आपण दुखावतो आहोत व खऱ्या मनाने बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या भावनांशी खेळतो आहे याचे तरी भान या दोघांना असावे. पण या दोघांना प्रसिद्धी देणाऱ्या वृत्तवाहिन्यांनी आपले काम हे वृत्त प्रसारित करण्याचे आहे बातमी बनवण्याचे नव्हे हे लक्षात घेतले पाहिजे.
                     बाळासाहेबांच्या महानिर्वाणानंतर काही तासांच्या अवधीतच स्मारकावरुन वाद लावुन देणाऱ्या वृत्तवाहिन्यानी आपल्या नैतिकमुल्यांची तरी आठवण ठेवावी. ज्यानां आपल्या प्रभागा शिवाय कोणी ओळखत नाही अशा नगरसेवकांच्या तोडांत बुम माईक घुसवुन त्यांची प्रतिक्रीया दाखवण्याची गरज काय होती? ‘सबसे तेजच्या प्रतिक्रियानीं आपण एका मोठ्या समुहाच्या नेत्याचा व त्या समुहाच्या भावना भडकवण्याचे काम करतो आहोत हेच काय ते एकमेव सत्य. काहीनी तर स्मारक कुठे व्हावे म्हणुन लोकानां संदेश पाठवायला सांगितले.  काही महाभागांनी तर बाळासाहेब वर्सेस बाबासाहेब अशा आशयांचे ग्राफिक्स वापरण्याचे पराक्रम सुद्धा केले. पण आपण या दोन्ही समुहाच्या नेत्यांचा व त्या समुहाच्या भावनेशी खेळत त्यांच्या भावना भडकावण्याचे काम करत आहोत असे या वृत्तवाहिन्यानां कदापी वाटले नाही का. काही वाहिन्यां आता युतीत मनसेला सामिल करण्यासाठी व रिपाईला बाजुला काढण्यासाठी या बातम्यांचे वार्ताकन करत असल्याचे दिसुन येते. हे सर्व पाहुन पत्रकारांनां अद्दल घडवणारे व त्याच्या ओबी व्हॅन फोडणारे बाळासाहेब बरोबरच होते असे स्पष्ट जाणवते.


Comments

Popular posts from this blog

मोदींची मिठी डोळ्यात खुपणाऱ्यांसाठी एक खुलं पत्र

वाटेत तुझ्या काचाच गं…!

पार्थ नावाचा नवा स्पार्क