IPL सोबतच माझी ही मॅच..

  मॅचची अशीही आठवण...
(दोन्ही जर्सी सोबत एकाच स्टूडिओत)
अत्यंत अटीतटीच्या आणि शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सवर अवघ्या एका धावेने मात करत चौथ्यांदा आयपीएलच्या विजेतेपदावर कब्जा केला, ही मॅच जशी तुमच्यासाठी उत्कंठावर्धक ठरली तशीच माझ्यासाठी देखिल एक अनोखा अनुभव देणारी ठरली, तसा लहानपणापासून माझा आणि क्रिकेटचा दूरदूरवर संबंध नाही, आणि भारत-पाक सोडून मी मॅच सहसा पाहत नाहीच. त्यामुळे मॅच मध्ये स्ट्रोक, खेळी, शॉट्स याबद्दल मला फारच किमान ज्ञान. आणि म्हणूनच आयपीएलच्या १२ व्या सिजनची फायनल मॅच माझ्यासाठी वेगळी ठरली,
ऑफीसमध्ये पोहचेपर्यंत आज फायनल आहे याबाबत माहितच नव्हतं, ऑफीस डेस्कवर चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्सची जर्सी पाहिल्यावर लक्षात आलं आज आपल्याला यावरच बातम्या द्यायच्या आहेत, बऱ्याचदा आम्ही विशेष विषयांच्या बातम्या देत असतांना तसाच गेटअप करत असतो. वेषभूषा ही संबंधित बातमीशी साधर्म्य असणारी असावी असा किमान प्रयत्न असतो, म्हणून IPL मॅचवर आधारीत पहिलं बुलेटीन सहकारी वैभव कुलकर्णीनीं घेतलं आणि आता बहुदा फार काही नसेल असा मीच माझा गैरसमज समज करुन घेतला, आणि नंतर जेव्हा बातम्यांसाठी आलेले पाहुणे थांबले ते पाहून लक्षात आलंच की हे सगळं आपल्या नशिबी येणार. मग आपली तयारी सुरु.
तशी मॅच संपण्याआधी माझी शिफ्ट संपली होती पण रात्री बुलेटीन घ्यायचं म्हणून थांबलो, मॅचचा अंदाज घेऊन मी पहिल्यांदा चेन्नई सुपरकिंग्सची आणलेली पिवळी धम्मक जर्सी घातली, माझ्या जर्सीला बघून माझ्या काही सहकाऱ्यांनी चेन्नई हारणार जर्सी बदला असं सांगितलं तर काहींनी तुम्हाला अंदाज आलेला दिसतो कोण जिंकणार असं म्हणून चिडवलं. अगदी हसत खेळत आम्ही इनपुटवर बसून मॅचचा आनंद घेत होतो. जवळजवळ सगळ्यांनीच आपल्या हातातलं काम ठेऊन नजरा टिव्ही स्क्रिनकडे वळवल्या होत्या. प्रॉड्यूसरने दोन्ही ब्रेंकिंग टाईप करुन घेतल्या होत्या. आम्ही मस्ती करत कॉमेन्ट्री करत मॅच बघत होतो. इतक्यात बुलेटीनची वेळ झाली, इलेक्ट्रोनिक मिडीयात अर्ध्या अर्ध्या तासाने होणारी २२ मिनिटांची बुलेटीन्स.. त्यामुळे रात्री ११.२१ ला स्टुडीओत जाऊन बसावं लागेल असं वरिष्ठांनी सुचवल्यानंतर मग मात्र एकच गोंधळ उडाला, कारण मी जर्सी घातली होती चेन्नई सुपरकिंग्सची आणि ऐनवेळी जर मुंबई इंडियन्स जिंकली तर असा प्रश्न डोक्यात घोळतंच होता. या प्रश्नाला उत्तर मिळत नाही तोच घड्याळाचा काटा वाढत होता आणि सुमारे ११.२७ ला शेवटचा बॉल राहीला अशी माहिती मिळाली तेव्हा मॅच किती उत्कंठावर्धक आहे याचं वर्णन मी लाईव्ह करत होतोच. त्याचवेळेस सोबतीला क्रिडा पत्रकार आणि क्रिकेटचे प्रशिक्षक हे पाहुणे म्हणून स्टूडिओत होतेच, लाईव्हला मुंबई आणि थेट हैदराबादेतून प्रतिनिधी देखिल होतेच. आणि मग काय काळजाचा ठोका चुकवणारा क्षण आलाच एका क्षणात काहीही होईल अशी परिस्थिती होती, सगळ्या देशाला कोण जिंकेल याची उत्कंठा होती... तर मी... कोणी का जिंकेना पण मला जर्सी बदलावी लागेल का? आणि जर बदलावी लागलीच तर कुठे बदलू? त्यावेळेस बॅटिंग कोण करणार? हा प्रश्न पडला (एखादं दृष्य जेव्हा न्यूज चॅनेलच्या स्क्रिनवर दिसतं तेव्हा त्यादृष्याचं वर्णन करण्यासाठी जे शब्द आम्ही वापरतो त्याला आम्ही बॅटींग असं म्हणतो). आणि अखेर मुंबई इंडियन्स जिंकली हे न्यूजरुममधून स्टूडिओ मध्ये आलेल्या जल्लोषाच्या आवाजाने कळत नाही तोवर पॅनल प्रोड्यूसर कानात आनंदाने किंचाळला, भाई मुंबई इंडियन्स जित गई... त्याच आवेशात मी देखिल अखेर मुंबईने विजयश्री खेचून आणला, धोनी सेनेला रोहित ब्रिगेडने हरवलं असं म्हणत बॅटिंग सुरु केली आधीच टाईप केलेल्या मुंबई इंडियन्सच्या ब्रेंकिंग स्क्रिनवर झळकत होत्या त्यामुळे बॅटिंग करायला फार काही मेहनत लागत नव्हती. मुंबई इंडियन्स जिंकून माझी गोची केली होती कारण मी चेन्नई सुपरकिंग्सची जर्सी घालून बुलेटीनला बसलो होतो. आता काय करु असा प्रश्न मला पण पडला, कॅमेरामन, आलेले पाहुणे, शिफ्ट इंचार्ज सगळेच माझ्या कडे बघत होते, कारण काही क्षणातच मला स्क्रिनवर दिसायचं होतं, मुंबई इंडियन्स जिंकलेली असतांना चेन्नई सुपरकिंग्सचं टिशर्ट घालून बातम्या वाचल्या असत्या तर प्रेक्षकांना नक्कीच अवडलं नसतं, अखेर शो मस्ट गो ऑन प्रमाणे स्टूडिओतच काही क्षणांसाठी शांतता ठेवून माईक आणि इअरफोन काढला त्याच वेगात झटकन चेन्नई सुपरकिंग्सची जर्सी काढली आणि स्टूडिओमध्येच रेडी ठेवलेली जर्शी कॅमेरामनने माझ्या दिशेने फेकली ती चटकन घातली आणि पुन्हा माईक ईपी लावून मी रेडी, एका क्षणात पाहुण्यांना देखिल कळलं नाही की मी नेमकं करतोय तरी कायआणि मग पुन्हा केसांवरुन हात फिरवत जिंकली रे जिंकली आपली मुंबई जिंकली अशी बॅटिंग सुरु.. त्याच आवेषात.. त्याच जोशात.. शो मस्ट गो ऑन !!
हे सगळं इतकं सहज आणि वेगात झालं की स्टुडीओत आपण काही क्षणात कपडे बदलतो हे लक्षातही आलं नाही, या प्रसंगातून मी किती मेहनत घेतली किंवा अँकरलाईफ किती वेगवान हवी असा दाखवण्याचा प्रयत्न नाही तर फक्त एक मॅच कशी संस्मरणीय ठरू शकते हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे. या मॅचसोबत तुमच्याही माझ्यासारख्या; काही आठवणी असतीलच. तेव्हा आठवणींचा संग्रह करायला हवा या भावनेतून हे लिहीलंय.

(मी आयपीएलच्या मुंबई इंडियन्सचा चाहता नाही, या संघाला फक्त मुंबई हे नाव असल्यामुळे भावनिक नातं आपसुक जोडलं गेलंय इतकंच)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मोदींची मिठी डोळ्यात खुपणाऱ्यांसाठी एक खुलं पत्र

वाटेत तुझ्या काचाच गं…!

पार्थ नावाचा नवा स्पार्क