पार्थ नावाचा नवा स्पार्क


#स्नेहिल_बाण #स्नेहिल_म्हणे


पार्थ पवार नावाच्या त्रिकोणाची तिसरी बाजू

आज हा लेख वाचत असतांना पार्थ पवारवरच का लेख लिहावासा वाटला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याला उत्तर हे आहे की, पार्थ पवार हा राजकारणात आलेला खऱ्या अर्थाने युवा चेहरा. तसा पार्थ काही पहिला नाही यंदा सुजय विखे, रणजित सिंह आणि पार्थ यांच्या सक्रिय राजकारणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची चर्चा झाली. सुजय विखे आणि रणजित सिंह हे याधीच राजकारणात सक्रीय होते म्हणून त्यांच्याबद्दल मला लिहावसं वाटलं नाही त्यातुलनेत पार्थची पाटी तशी कोरीच म्हणून हा लेख लिहीतोय, हा लेख लिहायला मला राष्ट्रवादीच्या कुठल्याच नेत्याने किंवा पक्षाने सांगितलं नाही. परंतु गेल्या काही दिवसांपूर्वीच्या घडामोडी पाहता पार्थ सारख्या तरुण उमेदवारासाठी लिहावं असं जरुर वाटलं. म्हणून लिहीतोय.
एका राजकीय पुढाऱ्याचा मुलगा राजकारणात आला तर त्यात वेगळं ते काय? ते होणारच होतं.. कधी ना कधी तो राजकारणात येणारच होता.. किंवा कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज्याच उचलायच्या का? असे अनेक प्रश्न आणि दावे उपस्थित झाले. खुद्द पार्थच्या आजोबांनी सगळ्या जागा जर परिवारातल्या सदस्यांनी लढवायच्या तर कार्यकर्त्यांनी काय करायचं असं म्हटलं होतं त्यामुळे पार्थ पवारचं काय होणार असा प्रश्न सगळ्यांना पडला होता.  हिवाळ्यात सफेद कुर्ता आणि राहुल जॅकेट घालून पार्थ पवार मावळच्या नाक्यांवर, लोकांशी चर्चा करतांना पहायला मिळाला. तेव्हाच पार्थ यंदा लोकसभेची तयारी करतोय हे सगळ्यांना कळून चुकलं. जसा कार्यकर्त्यांचा गराडा शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या भोवती होता तसंच गर्दीचं वलय पार्थला देखिल सुरुवातीपासून मिळालं. अर्थात मावळ मध्ये कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्यानंतर मतदार संघ बांधण्याचं काम पार्थनं सुरु केलं. आणि अचानक पार्थला तिकीट देणार नाही शरद पवारच पुन्हा निवडणूक लढवतील असं कळलं नंतर शरद पवारांनीच माघार घेतली आणि पार्थचं नाव जाहीर झालं, अशा सगळ्या राजकीय घडामोडी घडत होत्या याकाळात पार्थ कुठेच कोणत्याच जाहीर कार्यक्रमामध्ये किंवा प्रसारमाध्यमांशी बोलला नाही. पण पार्थला तिकीट दिल्यानंतर अनेकांच्या पोटात दुखलं अर्थात त्यात आघाडीवर विरोधक असणार यात शंकाच नाही. म्हणून पार्थवर टीका देखिल जोरदार झाली.
पार्थकडून सगळ्यांच्या अपेक्षा होत्या, आहेत आणि राहतील. पार्थ हा पवार कुटुंबातील चौथ्या पिढीतला राजकीय सदस्य, शरद पवारांच्या मातोश्री, स्वत: शरद पवार, अजित पवार आणि मग पार्थ पवार अशी ही राजकीय क्षेत्रातली पार्थही चौथी पिढी आणि याचमुळे पार्थ कसं राजकारण करतो याकडे अर्थातच राजकारण्यांसोबत सर्व मिडीयाचंही लक्ष होतच. पार्थला राष्ट्रवादीने तिकीट कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर दिलं. विशेषकरुन शेकापनं पार्थसाठी शरद पवारांची मनधरणी केली. आणि शरद पवारांनी निवडणूकीच्या रिंगणातून स्वत: बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. निर्णय अगदी योग्यच होता कारण एकाच लोकसभेत आजोबा, मुलगी आणि नातू असं चित्र देशानं पाहिलं असतं, अर्थात संसदेत हे चित्र दिसेलच. परंतु पार्थला तिकीट दिल्यानंतर अनेकांनी नाकं मुरडली,  का तर म्हणे, राजकीय पुढाऱ्याच्या मुलानेच का पुढारी व्हावं? परंतु मला हेच कळत नाही जर राजकारण्याचा मुलगा राजकारणी झाला तर त्यात त्याची चूक काय? पिढानंपिढ्या लुटणारे ज्वेलर्स तुम्हाला चालतात, पिढ्यानंपिढ्या लुटणारे पुरोहीत तुम्हाला चालतात मग एखाद्या राजकारण्याच्या मुलाला तिकीट मिळालं तर त्यात गैर काय? अर्थात पार्थला तिकीट जरी मिळालं असलं तरी त्याला अजून स्वताला सिद्ध करायला वेळ देणं तितकंच गरजेच आहे. अजित पवार पार्थसाठी प्रचंड मेहनत घेतायत. संपूर्ण पवार कुटुंब पार्थसाठी मैदानात उतरलंय अशा अनेक बातम्या देखिल आल्या तर गैर काय असा प्रश्न देखिल आम्हाला पडलाच कारण जर तुमचे आई बाबा तुमचे पालक तुम्हाला चांगल्या कॉलेजात प्रवेश मिळवून देण्यासाठी जितकी धडपड करतात तितकीच धडपड अजित पवारांनी केली तर त्यात त्यांचं काही चुकलं का? बापाचं कर्तव्य पार पाडणं हा गुन्हा कसा असू शकतो. त्यात ‘पोरासाठी बापाला मतं मागण्याची वेळ आली’ अशी कबुली खुद्द अजित पवारांनीच दिली.  
उमेदवारी मिळाल्यानंतर पार्थ कधी बोलणार याची उत्सुकता सगळ्यांच होती कारण आपल्या भाषणात राजकीय मुत्सद्देगिरीचा अचूक वापर करणारे आजोबा शरद पवार, परखड आणि फटकळ असणारे वडील अजित पवार आणि संयमी, हसत खेळत समोरच्या अचूक उत्तर देणाऱ्या स्पष्टवक्त्या आत्या सुप्रिया सुळे यांच्यापैकी कोणते गुण पार्थकडे आहेत हे पाहण्यासाठी सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहचली होती आणि नेमका गोंधळ इथेच झाला. पहिल्या भाषणातच पार्थ चुकला, घाबरला, गोंधळला. तरी देखिल दोन-चार मिनिटं बोलला. पण यानंतर मात्र टीकेचा धनी झाला, टीकेचा भडीमार सुरु झाला. आता मला सांगा एखाद्याच्या घरात जरी शेकडो माणसांचा राबता असला तरी तो माणूस बोलघेवडा असलाच पाहिजे का? तर तुम्ही म्हणाल जो राजकारणात आहे त्याने किमान व्यवस्थित बोलणं तरी अपेक्षित आहे. तर हो....आहेच.  राजकीय पुढारी हा जनतेचा आवाज संसदेत मांडतो त्यामुळे त्याच्याकडे उत्तम शब्दभांडार असणं गरजेचं आहे. परंतु पहिल्या भाषणात त्यांच्याकडून तुम्ही राज ठाकरेंसारख्या भाषणाची अपेक्षा ठेवू शकत नाही. सात -आठ हजारांच्या जमावापुढे आलेला, पहिल्यांदा भाषणाला उभा राहिलेला पार्थ पाहून मला माझं पहिलं बुलेटीन तर आठवलंच सोबतच त्याच वेळेस स्व. आर.आर. पाटील पहिल्यांदा शपथ घेताना थरथरलेलेही आठवलेच. आणि त्याच आबांनी नंतर काय बेधडक निर्णय घेतले हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिलंच. मंत्री राम शिंदेनीं पार्थची नक्कल करत जमत नाही तर का करता? अशी टीका पार्थच्या भाषणावर केली. जमतं तर सगळ्यांना... परंतु करु तर दिलं पाहिजे, शिंदे साहेब. असं म्हणावंस वाटलं कारण आईच्या पोटातून कोणी शिकून येत नाही ना? भाषणांची कला ज्यांना अवगत आहे, ज्यांनी शब्द चातुर्याने अनेक स्वप्न दाखवली त्या स्वप्नांचं काय झालं हे तुम्हा आम्हा सोबत सगळ्यांनाच माहित आहे.
असो.. नंतर पार्थने लोकलनं उलट केलेला प्रवास देखिल तितकाच चर्चेचा विषय झाला तर मला सांगा गर्दीत लोकलनं प्रवास करणारा कोणता पुढारी तुम्ही या आधी पाहिलाय? राज ठाकरे आणि राहुल गांधी यांनीही गर्दीच्या वेळेस लोकल प्रवास टाळलाच होता. या नेत्यांचं बघून गर्दीतून प्रवास करण्याचा प्रयत्न अबू आझमींनी केला मग प्रवाशांनी शिव्यांची कशी लाखोळी वाहीली ते अबू आझमींनाच जाऊन विचारा. घोड्यावरुन प्रवास असो किंवा धावणं असो यावरुनही टीकेचा सामना त्यांना करावा लागला. घोड्यावरुन रपेट मारण्याचा मोह जर रावसाहेब दानवेंसारख्या भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना आवरत नसेल तर मग पार्थ की क्या बात?ज्या हेमा मालिनीने शेतात जाऊन पिकांची कापणी केली, ज्या उर्मिला मांतोडकरने थेट रिक्षातून सेल्फी काढून घेतले त्यात नव्या दमाच्या पार्थच्याच धावण्याची चर्चा का?
पार्थचं ‘टेम्पल रन’ पण फार चर्चेत राहिलं, देवळात जाऊन देवाच्या पाया पडणं, तुकाराम बीज सोहळ्यात नृत्य करणं अनेकांना पचनी पडलं नाही. पब मध्ये नाचणारे देवळात नाचू लागले असं म्हणत अनेकांनी आपल्या अकलेचे तारे तोडले. बरं पब आणि डिस्को तसंच नाईट लाईफ बाबत कोण आग्रही होतं हे महाराष्ट्राला माहीत आहेच. यानंतर कहर झाला तो पार्थने एका कथित पाद्र्याच्या चर्चमध्ये जाऊन घेतलेल्या आशीर्वादामुळे. एरव्ही शेंदूर फासलेल्या दगडासमोर हात जोडून उभे राहिलेले राजकारणी आपण पाहिलेत, मुस्लिम धार्मियांच्या टोप्या घालून इफ्तार पार्ट्यांमध्ये फळांवर ताव मारणारे राजकारणी आम्ही पाहिले. परंतु ख्रिश्चन धर्मियांच्या चर्चमध्ये गेलेले राजकारणी आपण फार क्विचितच किंवा नाहीच पाहिले असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि नेमकं घडलंही अगदी तसंच पार्थ हा ख्रिश्चन धर्मियांच्या मिशनरी असणाऱ्या चर्चमध्ये गेला आणि तिथल्या त्या कथित पाद्र्याचा आशीर्वाद घेऊन आला. सर्वधर्म समभाव जर देशात अहे तर मग पोटात का दुखलं? आता धर्म प्रसार करणाऱ्या ख्रिश्चन मिशनऱ्यांमध्ये संमोहीत करुन गरीबांवर होणारे मानसिक उपचार हा लिखाणाचा एक वेगळा विषय. परंतु जेव्हा परिक्षा असते तेव्हा प्रत्येकाला जसे ३३ कोटी देव आठवतात तेव्हा मतांसाठी चर्च मध्ये जाणं गैर काय? बरं तिथे सुरु असलेल्या पडापडीमध्ये पार्थ काही‘हालेलुया.. हालेलुया.. करत पडला नाहीच...  राहता राहिला प्रश्न शरद पवारांचा तर शरद पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत कधी कर्मकांड केलं किंवा देवळांना भेटी दिल्या असं फार काही आपल्या पाहण्यात नाही म्हणून पुरोगामी विचारांच्या आजोबांचा नातू टेंपल रन मध्ये अडकतो की काय? असा प्रश्न अनेकांना पडणं स्वाभाविकच. कारण प्रबोधनकार ठाकरेंचे हिंदूत्वावरील प्रखर विचार आणि त्यानंतर ठाकरे कुटुंबियांचं हिंदूत्व हे परस्पर विरोधी म्हणून लोकांना चिंता पडली असावी.
तर पार्थ हा लंडन मध्ये शिकून आलेला एका राजकीय घराण्यातला पुढारी, त्यानं थेट खासदारकी न लढवता स्थानिक पातळीवरुन कामाला सुरुवात करावी असं देखिल अनेकांना वाटलं तर मला सांगा मोदी पण तर थेट मुख्यमंत्री आणि पंतप्रधान झालेच की. आज एकविसाव्या शतकात देश बदलतोय, दोन-एक वर्षात सर्वात मोठा तरुणांचा देश म्हणून भारताची जगात ओळख होईल मग तरुण खासदार आणि जो तडफदार जरी नसला तरी खऱ्या अर्थाने तरुण आहे तो संसदेत का नसावा?घराणेशाहीचे आरोप करत आपण किती टीका करणार? वडिलांचा व्यवसाय पुढे नेणारे असे किती तरी तरुण हा लेख वाचत असतीलच ना.. आज इतक्या वर्षानंतर प्रशांत किशोरची गरज जर शिवसेनेला प्रचारासाठी पडू शकते तर पार्थची पाटी अजून कोरी आहे त्याला चुकण्याचा आणि चूका सुधारण्याचा अधिकार आहेच, ज्यांनी लाखो कार्यकर्ते घडवले असे शरद पवार यांची त्याला साथ असल्यावर मावळमधून तरुण मावळा तयार होऊच शकत नाही हा समज पुरता चुकीचा आहे त्यामुळे महाराष्ट्राचा पप्पू किंवा तैमुर म्हणून ज्या पार्थचं नामकरण सहज होतंय त्यांनी हे विसरु नये की तैमुरच्या एका फोटोचे फोटोग्राफरला हजारो रुपये मिळतात आणि सैफ अली खान सारखा बड्या अभिनेत्याला ‘तैमूर इज् विथ् मी ऑन सेट टूडे’ असं मिडीया प्रतिनिधींना सांगून कॅमेऱ्याचे क्लिक मिळवावे लागलात तर पप्पूने पाच राज्यात सत्ताधाऱ्यांना पप्पा आठवायला लावले हे देखिल कमी नाहीच.
मेरा देश बदल रहा है, आगे बढ् रहा है असं जर आपण म्हणत असु तर युवकांना संधी देणं तितकंच गरजेचं आहे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेच २०१४ मध्ये हेरलं होतं आणि अनेक नवख्यांना संधी दिली होती यामध्ये तीच संधी इतर पक्षांनी ही दिली तर त्यांचे देखिल मी असंच स्वागत करु इच्छितो, पार्थ आज राष्ट्रवादी कॉग्रेंस मध्ये आहे म्हणून त्याचे कौतुक नसून तो तरुण आहे परिपक्व जरी नसला तरी त्यासाठी त्याला संधी नाकारणं उचित होऊ शकत नाही. खरंतर पार्थला या परिस्थितीत निवडणुकीच्या रिंगणात उतरवून अजित पवारांनी खेळी खेळली नसुन जुगार खेळलाय. कारण आजवरचा पवार कुटुंबियांचा इतिहास पाहिला तर या परिवारात पराभव कोणाच्या नशिबी नाहीच. परंतु सद्यस्थिती पाहिली तर मतदार संघात ६ पैकी ५ आमदार युतीचे असताना आणि श्रीरंग बारणेंसारखा तगडा खासदार विरोधात असताना पार्थला निवडणूकीच्या रिंगणात उतरवण्याचं धाडस आणि हे निवडणुकीचं आव्हान पेलण्याचा पार्थचा आत्मविश्वास हा तगडाच म्हणावा लागेल. संसदेत मोठ्या प्रमाणात तरुणांचा सहभाग असावा हाच माझा आग्रह असून पक्ष कुठला आणि उमेदवार कोण आहे याच्याशी मला कुठलंच देणघेणं नाही. सरतेशेवटी पार्थसोबतच डॉ.सुजय विखे, डॉ.श्रीकांत शिंदे, डॉ.अमोल कोल्हे, रणजितसिंह मोहिते-पाटील, हिना गावित या सगळ्या तरुण उमेदवारांना शुभेच्छा, भविष्यात तरुणांना संधी मिळावी आणि त्याचं मनोबल वाढावं हाच या लेखामागचा मुख्य उद्देश...
लेखक
©स्नेहिल शिवाजी झणके
पत्रकार, tv9 मराठी
मो. 9892763658

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मोदींची मिठी डोळ्यात खुपणाऱ्यांसाठी एक खुलं पत्र

वाटेत तुझ्या काचाच गं…!