मारुनच टाका पोलिसानां.....!!!



मारुनच टाका पोलिसानां.....!!!

                संतश्री सदगुरु विश्वात्मा महात्मा स्वर्गीय. लख्खनभैय्याजी यांचा एन्काउंटर केल्या मुळे आपल्या पोलिसदलातील पोलिसानां फाशीची शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकीलांनी केलीय असं वाचण्यात आलं. मी तर म्हणतो देताच कशाला या पोलिसानां शस्त्र. सर्वात सोप्पा पर्याय पोलिस खातेच बरखास्त करा आणि स्व.शाहिद आझमी सारखे किंवा मझिद मेमन सारखे नाही तर स्व.लख्खन भैय्या सारख्या ह्यात असणाऱ्या समाजसुधारकानांच सांगा आता आमचे संरक्षण करायला. उगीच नसता भार सरकारच्या डोक्यावर कशाला? आता कार्यरत असणाऱ्या पोलिसानां सांगा या सारख्याच्यां हाता खाली काम करा. कारण 12 – 12 तास काम करण्याची पोलिसानांच सवय आहे ना.. म्हणुन...!!
                 नुकतीच सरकारी वकीलांनी मागणी केलीय की, लख्खनभैय्या एनकाऊन्टंर प्रकरणी पोलिसानां फासावर लटकवा. मी तर अशी मागणी करतो की, ज्या सरकारी वकिलानीं अशी सुयोग्य मागणी केली त्याच्या हातात अतिरेक्यांचे सापडलेली एखादी मशीनगन असेल तर ती द्या {अतिरेक्यांनी आणलेली मशीनगन यासाठीच म्हटलं की, पोलिस दलातील बंदुकीनां आता गंज लागला असेल ना म्हणुन…} आणि त्या वकील महाशयानां सांगा तुम्हीच तुमच्या हातानीं या संपुर्ण पोलिस दलाला गोळ्या घाला. कारण आपली सुरक्षा करायला तुमच्याकडे आहेतच संतश्री लोक. आणि हो वकील साहेब कृपया करुन माननीय न्यायलयाकडुन महात्मा लख्खनभैय्याजींच्या तसबीरी सर्व सरकारी कार्यालयात, शाळांत, महाविद्यालयात, मंत्रालयात, विधानभवनात लावण्याची परवानगी सुद्धा मिळवा. हे कमी झाले तर ज्या ठिकाणी एन्काउंटर झाला त्या ठिकाणी एखादे स्मारक बांधण्याची परवानगी मिळाल्यास सोन्याहुन पिवळे...
              महाराष्ट्रातील गॅंगवार कमी करण्यासाठी काही खतरनाक गुंडानां पोलिसांनी खऱ्या किंवा खोट्या चकमकीत मारले. अरे मारले तर मारले. गुंडानांच मारले ना..?? ज्यांच्या मुळे वारंवार कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येत होती. ज्यांच्या मुळे मुलींवर बलात्कार होत होते. ज्यांच्या मुळे अनेक लोक भितीच्या छत्रछायेत जगत होती. ज्यांनी अनेकांकडुन खंडणी घेतली. ज्यांनी अनेकानां संपवले त्यानां आमच्या पोलिसांनीं संपवले मग काय चुक केली?? आपल्या सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी केलेल्या एनकाऊन्टंर मुळे आता त्यांचे कुटुंब असुरक्षित झाले त्यांचे काय. कमावती व्यक्ती गेल्या अनेक वर्षापासुन गजाआड आहेत. खरंच या व्यवस्थेसाठी मला शब्दच सुचत नाही. भकास बकवास आणि भेदरलेलं प्रशासन.
          लख्खनभैय्याच्या एन्काउंटर प्रकरणी सरकारी वकीलांनी केलेल्या मागणीचा माझा याच शब्दांत निषेध.. निषेध.. निषेध...!!!!

Comments